SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 सावदा प्रतिनिधी :- मुबारक तडवी
जळगाव जिल्ह्यात महावितरण विद्युत कंपनीकडून रात्रीच्या वेळेस जंगल फीडरवरील शेतीसाठी होणाऱ्या वीज पुरवठ्यात तब्बल दोन तासांची कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप, नाराजी व रोष व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे यापुढे शेतकऱ्यांना आठ तासांऐवजी केवळ सहा तासच वीज पुरवठा मिळणार असल्याची माहिती समोर येताच ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगोदरच अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती, केळी पिकांचे नुकसान, पेट्रोल-डिझेल टंचाई, तसेच शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव अशा अनेक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता विजेच्या कपातीचे नवे संकट उभे ठाकले आहे.
🌧️ अवकाळी पावसामुळे केळी बागांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. मका, गहू, हरभरा, कापूस यांसह विविध पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम केळी निर्यातीवर झाल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात माल विकण्याची वेळ आली आहे.
⛽ दुसरीकडे पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्था आणि शेतीसंबंधित कामांवर परिणाम होत असून व्यापारी, वाहनधारक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत महावितरणकडून दोन तास वीज कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतकरी बांधवांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “आधीच कमी वेळेत पाणीपुरवठा होत असताना आता केवळ सहा तास वीज मिळाली तर शेती पिकांना पाणी द्यायचे तरी कसे?”
या निर्णयाविरोधात विविध राजकीय व सामाजिक स्तरातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
🗣️ प्रतिक्रिया
🔹 धनंजय शिरीष चौधरी
काँग्रेस आय जळगाव जिल्हाध्यक्ष
“महावितरण विद्युत कंपनीने शेतकरी राजाच्या हक्काच्या रात्रीच्या जंगल फीडरवरील वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात जाहीर केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असून तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
🔹 अमोल हरिभाऊ जावळे
आमदार, रावेर-यावल मतदारसंघ
“शेतकरी बांधवांना शेती पिकांना पाणी देण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा आवश्यक आहे. एमएसईबीने दोन तासांची कपात त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे आठ तास नियमित वीज पुरवठा करावा,” अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे.
⚠️ निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
महावितरणने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा जिल्हाभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात येत आहे. सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर वीज कपात केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
