SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका| प्रतिनिधी – इम्रान खान
भुसावळ नगरपालिकेतील वातावरण सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले असून नगराध्यक्षांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. खानदेश परिसरातील जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे जगन भाऊ सोनवणे यांनी संतोष भाऊ यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.
जगन भाऊ सोनवणे यांनी आरोप केला की, काही विरोधकांकडून संतोष भाऊ यांना अडचणीत आणण्यासाठी तसेच त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप व खटले उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारच्या राजकीय डावपेचांचा भीम आर्मी तीव्र शब्दांत निषेध करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
⚖️ महिला नगराध्यक्षांचा अपमान निंदनीय
यावेळी बोलताना जगन भाऊ सोनवणे म्हणाले की, नगरपालिकेत एस.सी. प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष असताना त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी वागणूक देणे अत्यंत निंदनीय आहे. काही भाजप नगरसेवकांकडून नगराध्यक्षांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अशा प्रकारची दादागिरी भीम आर्मी कदापि सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा देत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच काही विशिष्ट लोकांना ठेके मिळावेत यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर दलित समाजातील महिला नगराध्यक्षांचा अपमान किंवा दबाव टाकण्याचे प्रकार सुरू राहिले, तर भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
🏛️ “नगरपालिका सभेत दादागिरी चालणार नाही” – युवराज लोणारी
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेतील सभेबाबत प्रतिक्रिया देताना युवराज लोणारी यांनीही कठोर भूमिका मांडली. नगरपालिका सभेत कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सभेमध्ये एखाद्या विषयाला समर्थन देण्यासाठी आमच्यावर दबाव का टाकला जात आहे, असा सवाल उपस्थित करत कोणत्याही दबावाखाली आम्ही समर्थन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
📌 विकासकामांवरही प्रश्न
लोणारी यांनी पुढे सांगितले की, ज्या ठिकाणी विषय योग्य असेल तिथेच आम्ही समर्थन देऊ. आमच्या वाड्यातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांमुळे आमचे विषयही मंजूर होणे आवश्यक आहे.
सत्ताधाऱ्यांचे तीनशे ते साडेतीनशे विषय अवघ्या पंधरा दिवसांत मंजूर होतात, मात्र आमचे विषय प्रलंबित ठेवले जात असल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहरातील सर्व भागांचा समान विकास व्हावा यासाठी प्रशासनाने पक्षपात न करता सर्व विषयांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे भुसावळ नगरपालिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काळात या वादाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ⚡
