spot_img
spot_img
Homeमोठी बातमीप्रजासत्ताक दिनी सन्मानित झालेल्या दोन नववीतील विद्यार्थिनींचा विहिरीत ढकलून खून; साक्री गाव...

प्रजासत्ताक दिनी सन्मानित झालेल्या दोन नववीतील विद्यार्थिनींचा विहिरीत ढकलून खून; साक्री गाव शोकसागरात

आरोपीला ताब्यात; अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी मृतदेहांसमोर ग्रामस्थांचा ठिय्या

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका प्रतिनिधी : ✍️ इम्रान खान

भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. ट्युशनसाठी घरातून निघालेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व शोककळा पसरली आहे. या प्रकरणात रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत विद्यार्थिनी लक्ष्मी अभय महाजन (वय १५, इयत्ता नववी, रा. गायत्री मंदिराजवळ, साक्री) व नयना विजय चौधरी (वय १५, इयत्ता नववी, रा. विठ्ठल मंदिराजवळ, साक्री) या जनता हायस्कूल, साक्री येथे शिक्षण घेत होत्या.

सोमवारी सकाळी दोघी ट्युशनसाठी घरातून निघाल्या; मात्र त्या ट्युशनला पोहोचल्या नाहीत. ट्युशन शिक्षकांनी एका विद्यार्थ्यामार्फत घरी कळविल्यानंतर पालक व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी सुमारे ७.४५ वाजता एका दुचाकीवर एक मुलगा व दोन मुली ‘ट्रिपल सीट’ जाताना दिसून आले; मात्र अंतर जास्त असल्याने वाहन क्रमांक व तरुणाची ओळख स्पष्ट होऊ शकली नाही.

oplus_0

दरम्यान सकाळी सुमारे ९ वाजता गावाजवळील सोपान महादेव फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोघींच्या शाळेच्या बॅगा आढळून आल्याने संशय बळावला. तत्काळ विहिरीत शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाणे व बाजारपेठ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील मुकेश कोळी यांनी विहिरीत उतरून सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी महाजन हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तीन ते चार ‘बिलाई’च्या सहाय्याने शोध सुरू ठेवत साधारण पावणेदोनच्या सुमारास नयना चौधरी हिचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला.

पहिला मृतदेह बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती; मात्र आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली. जोपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढले जात नाहीत व आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महिला-पुरुषांनी मृतदेहांसमोर ठिय्या मांडला. सकाळी नऊपासून दुपारी तीन वाजेपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

दरम्यान, रोहन नरेंद्र चौधरी याने “मी दोघींना विहिरीत ढकलले” अशी माहिती दिल्याचे समोर आले. त्या आधारे तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. घटनास्थळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत होती. काही ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली; मात्र पोलिस प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता संयम राखत कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी २६ जानेवारीच्या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले होते तसेच लेझीम पथकात वाद्यवृंदात सहभाग घेतला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थ, शाळा व आयोजकांच्या वतीने त्यांना बक्षिसे देऊन सत्कारही करण्यात आला होता. आनंदात साजरा झालेला तो दिवस आणि आजची ही दुर्दैवी घटना — या विरोधाभासाने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

या घटनेमुळे साक्रीसह संपूर्ण भुसावळ तालुका शोकसागरात बुडाला असून दोषींवर कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.6 ° C
29.6 °
29.6 °
22 %
5kmh
0 %
Mon
34 °
Tue
36 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
37 °

Most Popular

error: Content is protected !!