SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका प्रतिनिधी : ✍️, दि. १७ जानेवारी २०२६ :
भुसावळ नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शहराच्या कारभारावरून मोठा वाद उफाळून आला असून, नगरपरिषदेचे विद्यमान दप्तर व कार्यालयीन कारभार संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालयात स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कसलाही अधिकृत ठराव, निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता हे स्थलांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर, मनमानी आणि जनतेच्या आरोग्य सेवेशी खेळ करणारी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

बेकायदेशीर स्थलांतराचा घाट — प्रशासकीय संमतीच नाही
शनिवारी दुपारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लोणारी यांनी स्पष्ट केले की,
नगरपालिका कार्यालय स्थलांतरासाठी मुख्याधिकारी यांची कोणतीही लेखी संमती नाही, तरीही रुग्णालय परिसरात तोडफोड सुरू असून कर्मचारी वर्गाच्या मदतीने दप्तर उचलण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
हा प्रकार पूर्णतः बेकायदेशीर असून याविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
“कोंडवाडा” विधानावरून थेट प्रतिप्रश्न
नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी विद्यमान नगरपरिषद इमारतीला “कोंडवाडा” अशी उपमा दिली होती.
याच वक्तव्याचा आधार घेत युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केला —
“जर विद्यमान नगरपरिषद इमारत कोंडवाडा असेल, तर त्याच कोंडवाड्यात शहरातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दाखल करणार आहात का?”
हा प्रकार म्हणजे निव्वळ मनमानी, अराजकता आणि प्रशासनावर राजकीय दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.

गरुड परिवाराच्या दानाच्या हेतूलाच हरताळ
भुसावळ शहरातील गरुड परिवाराने १ जानेवारी १९२७ रोजी साधारण एक एकर २० गुंठे जागा फक्त रुग्णालयासाठी दान दिली होती.
गरीब व सर्वसामान्य नागरिकांवर शहरातच उपचार व्हावेत, हाच या दानाचा उद्देश होता.
मात्र त्या जागेत पालिका कार्यालय सुरू करण्याचा घाट घालणे म्हणजे दात्यांच्या हेतूलाच हरताळ फासण्यासारखे असल्याचे लोणारी, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे व नगरसेवक पिंटू कोठारी यांनी स्पष्ट केले.
रुग्णांच्या जीवाशी खेळ
संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय हे आजही भुसावळातील गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण आहे.
या रुग्णालयात —
• सामान्य उपचार
• विविध तपासण्या
• रक्त चाचण्या
केवळ ५ रुपयांच्या केसपेपरमध्ये सुविधा
उपलब्ध आहेत.
भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने प्रसूती सुविधा सध्या उपलब्ध नसल्या तरी दैनंदिन उपचारांसाठी शेकडो नागरिक याच रुग्णालयावर अवलंबून आहेत.
अशा स्थितीत रुग्णालयातील जागेत कार्यालय हलविल्यास रुग्णांना जागा, सुविधा व उपचारांपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा लोणारी यांनी दिला.
नगरपालिका कार्यालय लांब — नागरिकांवर आर्थिक बोजा
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे.
संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालयात नागरिक उपचारासाठी पायी किंवा कमी खर्चात पोहोचू शकतात, मात्र
नगरपालिका कार्यालय दूर अंतरावर असल्याने शहरातील नागरिकांना विविध कामांसाठी रिक्षा, खासगी वाहने वापरावी लागतात व त्याचा थेट आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडतो.
कर भरणे, जन्म-मृत्यू दाखले, नळजोड, घरपट्टी, तक्रारी आदी कामांसाठी नागरिकांना वारंवार नगरपालिका कार्यालयात जावे लागते.
या खर्चाचा आणि गैरसोयीचा भान सत्ताधारी व विरोधक — दोघांनीही ठेवणे आवश्यक आहे, असा मुद्दाही या वादातून पुढे आला आहे.
शंभर वर्षांच्या दवाखान्याचे स्थलांतर वेदनादायी
नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले,
“हा दवाखाना शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहे. अनेक दात्यांनी केवळ गरीबांवर उपचार व्हावेत म्हणून मदत केली. अशा दवाखान्याचे बेकायदेशीर स्थलांतर म्हणजे शहराच्या इतिहासावरच घाला आहे.”
२५ कोटींचा प्रस्ताव द्या — भाजपा पाठिंबा देईल
लोणारी यांनी सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट केले की —
“पालिकेला इमारत नसेल तर शासनाकडून २५ कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकते. नगराध्यक्षांनी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे प्रस्ताव द्यावा. भाजपा पूर्ण सहकार्य करेल.
मात्र बेकायदेशीर स्थलांतर आम्ही खपवून घेणार नाही.”
‘अमृत’ योजनेच्या कामावरही नाराजी
‘अमृत’ योजनेचे काम बंद करण्यात आल्यावर लोणारी यांनी टीका करत सांगितले की,
“काम बंद करणे अयोग्य आहे. राजकारणामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागत आहे.
जलसाठा कुंभाची जागा बदलल्यास नागरिकांची अडचण वाढेल.”
सत्ताधारी–विरोधक संघर्ष; शहराचा विकास धोक्यात
पालिका स्थलांतर, अमृत योजना, विषय समिती निवड या सर्व मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली असून,
हा संघर्ष असाच सुरू राहिल्यास भुसावळ शहराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
पत्रकारितेचा धडा : ‘संत गाडगे महाराज’ नावाचा विसर
या संपूर्ण वादात एक गंभीर बाब समोर आली आहे.
सत्ताधारी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी, तसेच विरोधी गटातील भाजपा गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, उपगटनेते परीक्षेत बरहाटे व नगरसेवक निर्मल कोठारी — सर्वच जण पत्रकार परिषदेत “नगरपालिका रुग्णालय” असा उल्लेख करत होते.
मात्र — 👉 १२ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या काळात ठराव मंजूर होऊन या रुग्णालयाला अधिकृतपणे
“संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय, भुसावळ”
असे नाव देण्यात आले आहे.
तरीही सत्ताधारी व विरोधक — दोघांकडूनही संत गाडगे महाराजांचे पवित्र नाव उच्चारले न जाणे हे दुर्दैवी, दु:खद आणि सामाजिक जाणिवेच्या दृष्टीने गंभीर असल्याची भावना पत्रकार व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ही बाब केवळ राजकीय वादापुरती मर्यादित नसून —
सामाजिक संवेदनशीलता, ऐतिहासिक स्मृती आणि महापुरुषांच्या सन्मानाशी निगडित प्रश्न असल्याचे ठळकपणे पुढे येत आहे.
उपस्थिती
या पत्रकार परिषदेस
भाजप गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षित बरहाटे,
नगरसेवक निर्मल कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, प्रकाश बत्रा, विशाल नाटकर, सुजित भोळे, किरण कोलते, नितीन धांडे, निक्की बत्रा, आशिष पटेल, पुरुषोत्तम नारखेडे, अलबर्ट तायडे, गुणवंत बोरोले, कैलास चौधरी, उदय पाटील, अल्बर्ट तायडे आदी उपस्थित होते.
