SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) एरंडोल तालुका प्रतिनिधी : ✍️भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील आनंदनगर-नेब कॉलनी परिसरात शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी २०२६) मध्यरात्री झालेल्या शाब्दिक वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय अंदाजे ४२, रा. आनंदनगर-नेब कॉलनी) असे असून त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास अनिल सावकारे व त्याच परिसरातील रोहित भावसार (वय अंदाजे २५) यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद चिघळल्यानंतर रोहित भावसार याने झाडाची सिमेंटची कुंडी डोक्यावर मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अनिल सावकारे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच बाजारपेठ पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी प्रशांत परदेशी, उमाकांत पाटील तसेच शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जप्त केले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ट्रॉमा केअर सेंटर येथे पाठवण्यात आला आहे.
तपास सुरू
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.
⚖ कायदेशीर सूचना
ही बातमी पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीस दोषी ठरविणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. अधिकृत FIR, लागू कलमे व पोस्टमार्टम अहवालानंतर घटनेचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होईल.
