SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 सोयगाव तालुका प्रतिनिधी | अप्पा वाघ : ✍️
सोयगाव तालुका : तालुक्यात सध्या डिझेलटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आणि ट्रॅक्टरमालक हवालदिल झाले आहेत. नांगरणी, वखरणी, मशागत तसेच आगामी पेरणीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यासंदर्भात बनोटी येथील शेतकऱ्यांनी सागर खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार मनीषा मेने यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दररोज किमान ५० लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 🚜⛽
📄 निवेदनात मांडल्या गंभीर समस्या
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून-जुलै महिन्यातील पेरणी हंगाम अगदी जवळ आला असताना डिझेलच्या अभावी अनेक ट्रॅक्टर बंद पडण्याची वेळ आली आहे. परिणामी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका बाजूला अनिश्चित हवामानाचा सामना करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला डिझेल टंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वेळेत मशागत व पेरणी न झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याची गंभीर चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 🌧️🌱
निवेदनामध्ये ट्रॅक्टरमालकांना ओळखपत्राच्या आधारे डिझेल वितरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचा संताप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवेदनावर पंचायत समिती सदस्या वैभवी खैरनार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🚨 मशागतीसाठी नवी अट; “३५ लिटर डिझेल आणा, मगच ट्रॅक्टर मिळेल!”
सोयगाव तालुक्यातील काही ट्रॅक्टरचालकांनी डिझेलटंचाईवर उपाय म्हणून नवी शक्कल लढविल्याची चर्चा रंगू लागली आहे. शेतीची मशागत ट्रॅक्टरने करून घ्यायची असल्यास संबंधित शेतकऱ्याने ट्रॅक्टरमालकाला तब्बल ३५ लिटर डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी अट घातली जात असल्याचे सांगितले जात आहे. 😟
यामुळे स्वतःकडे ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांना डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत आहेच; मात्र ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही अशा शेतकऱ्यांनाही दुहेरी आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
⚠️ खरीप हंगाम धोक्यात?
सध्या तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेलटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेत प्रशासनाने उपाययोजना न केल्यास आगामी काळात शेतकरी आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.
