SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ तालुका प्रतिनिधी | इम्रान खान
देशभरात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले असल्याचा आरोप करत भुसावळ शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ होत असल्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती अर्थकारण कोलमडत असून महागाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम तसेच भुसावळ विधानसभा अध्यक्ष रोहन राजु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

📑 प्रमुख मागण्या
काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या –
1️⃣ पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरावर तात्काळ नियंत्रण आणावे.
2️⃣ घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
3️⃣ इंधनाचा निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करून नियमित पुरवठा सुरू करावा.
4️⃣ इंधनावरील विविध कर कमी करून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून केंद्र व राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
👥 आंदोलनात पदाधिकारी उपस्थित
यावेळी शहर सरचिटणीस संतोष साळवे, अजगर शेख, शैलेश अहिरे, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, जिल्हा घरेलू कामगार अध्यक्ष राजेश डोंगरदिवे, राम अवतार परदेशी, रमजान शेख, अमिर शेख, सोयल शेख, बाबा मिर्जा, अनिरुद्ध यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात भविष्यातही काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
