spot_img
spot_img
Homeशहरभुसावळात नैसर्गिक सांडपाणी नाला बंद करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न

भुसावळात नैसर्गिक सांडपाणी नाला बंद करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न

नागरिकांना धमक्या, आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न

SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) भुसावळ | प्रतिनिधी : इम्रान खान


भुसावळ नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक 192/5 (A) मधील पूर्वापार, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेला सांडपाण्याचा नाला बंद करण्याचा बेकायदेशीर व दादागिरीचा प्रयत्न काही खासगी व्यक्तींकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दि. 14 जानेवारी 2026 रोजी लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.


अयान कॉलनी, जीया कॉलनी, अली इजा कॉलनी, ओलीया मज्जीद हलीमा मज्जीद परिसर, रहम्मद मज्जीद कॉलनी, ईदगाह कॉलनी, सत्यसाईनगर, रेणुकामाता नगर आदी सुमारे 40 कॉलन्यांचे सांडपाणी या नैसर्गिक नाल्यामधून वाहते. सदर नाला हा खडका गावाच्या हद्दीतून येणारा असून राष्ट्रीय महामार्गावर मोरी (पुल) बांधून अधिकृतरीत्या प्रवाह सुरू ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती अर्जात नमूद करण्यात आली आहे.


विकासाच्या नावाखाली नाला बुजवण्याचा प्रयत्न


भुसावळ येथील विष्णू गुलाब नाराअजरोदीन पटेल यांनी संबंधित गटातील जमीन विकसित करण्याचा व्यवहार मूळ मालकांसोबत केला असून, प्लॉट विक्रीसाठी नैसर्गिक नाला बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या व्यक्तींनी बेकायदेशीरपणे गिट्टी, मुरूम व माती टाकून नाल्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला, तसेच कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


नागरिकांना थेट धमक्या; खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भाषा


या प्रकाराबाबत जाब विचारला असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे देत नाला बंद केल्याशिवाय थांबणार नाही, असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच दि. 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता फोनवरून धमक्या देण्यात आल्या, आणि कामात अडथळा आणल्यास खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देण्यात आल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.


आरोग्याचा धोका व रोगराई पसरण्याची भीती


नैसर्गिक नाला बंद किंवा अरुंद केल्यास परिसरातील घरांमध्ये सांडपाणी साचण्याची, दुर्गंधी पसरण्याची व साथीचे आजार फैलावण्याची गंभीर शक्यता आहे. यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा इशारा अर्जदारांनी दिला आहे.


धार्मिक स्थळाजवळ प्रवाह वळवण्याचा आरोप; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता


सर्वात गंभीर बाब म्हणजे, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तो मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक स्थळाच्या (मस्जिद) शेजारी वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे.


तत्काळ कारवाईची मागणी


या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन
• संबंधित व्यक्तींवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी
• नैसर्गिक नाला बुजवू नये याबाबत सक्त आदेश द्यावेत
• बेकायदेशीर टाकलेले साहित्य त्वरित हटवावे
अशी ठाम मागणी नागरिकांनी नगरपरिषदेपुढे मांडली आहे.
या प्रकरणाकडे आता भुसावळ नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


अर्जदार : शारुख चांद खान, फिरोज खान, इक्बाल खान, समीर सत्तार बागवान, मोहम्मद शोएब रझा, जावेद अकलम खान, सय्यद नदीम सय्यद अख्तर, नावेद शेख, सादिक आर. शेख, जुनेद चांद पिंजारी, मोहम्मद हुसेन अख्तर हुसेन, उज्जैन खान अस्लम खान, मुश्ताक खान रमजान खान, नासिर, याकूब, खलील शकील शेख

RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.8 ° C
26.8 °
26.8 °
46 %
1.9kmh
94 %
Sat
35 °
Sun
34 °
Mon
35 °
Tue
35 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!