SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 अमळनेर | तालुका प्रतिनिधी – मुन्ना शेख
पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पती भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, अमळनेर) याला ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा अमळनेर येथील न्यायालयाने सुनावली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी दिला.
🔪 पत्नीवर चाकूने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अमळनेर शहरात मजुरीचे काम करून घरी परतली होती. त्या वेळी ती आपल्या मुलगी रोशनीशी मोबाईलवर बोलत होती. याच दरम्यान तिचे पती भगवान शिंपी घरी आले आणि तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ करू लागले.
यानंतर आरोपीने “तुला मारून टाकतो” अशी धमकी देत घराबाहेर निघून गेला.
⚠️ घरासमोर बसलेल्या पत्नीवर हल्ला
त्या रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला घरासमोर ओट्यावर बसलेली असताना आरोपी पुन्हा घरी आला. त्याने पुन्हा शिवीगाळ करत तिला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जमिनीवर पाडले.
त्यानंतर पॅन्टच्या खिशातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून तिच्या गळ्यावर व शरीरावर वार केले. या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर, मानेवर, हनुवटीवर आणि दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
🏥 डॉक्टर व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरले महत्त्वाचे
या प्रकरणाचा खटला अमळनेर न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल (मंगरूळकर) यांनी एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
यामध्ये
फिर्यादी पत्नीचा जबाब
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवि टेलर व ज्ञानेश्वर संतोष
पंच साक्षीदार
डॉ. प्रकाश ताडे (अमळनेर ग्रामीण रुग्णालय)
यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
डॉक्टरांच्या अहवालानुसार धारदार शस्त्राने झालेल्या जखमांमुळे आरोपीचा पत्नीला ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
⚖️ न्यायालयाचा कठोर निर्णय
सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
त्याअनुसार न्यायालयाने –
भा.द.वि. कलम ३०७ अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड
जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल २ वर्षे कारावास व १००० रुपये दंड
अशी शिक्षा सुनावली.
👮 तपासात पोलिसांचे सहकार्य
या प्रकरणाच्या कामकाजात पोलीस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे (केस वॉच), पीएसआय उदयसिंग सांळुके (पारोळा), पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), प्रमोद पाटील (चोपडा शहर), सतीष भोई (अडावद), भरत इशी (मारवड) यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
📢 दरम्यान, पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने या प्रकरणात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
